कशाची सुरवात कधी आणि कशी करायची ह्याची माझी काही गणितं आहेत, होती. कॉलेजमधल्या नीलमोहराला पहिलं फूल आलं की अभ्यासाला सुरवात करायची असा आमचा प्रघात होता.
आजही दिवसाची सुरवात जर उगवत्या सूर्याला नमस्कार करून केली तर तर तो दिवस खूप छान जातो. असा माझा पक्क समज आहे. असो.
तर आज मी २ 'गमभन' विषयी लिहिणार आहे.
पहिलं 'गमभन' आहे या मायाजालातलं. मी माझा ब्लॉग सुरू केला तेव्हा मला माहीत नव्हतं की मी मराठीमधून पण यावर लिहू शकेन. बरचं गूगलिंग केल्यावर मला हे 'गमभन' सापडलं. आणि मी किती आनंदी झाले. यावर लिहिणं अगदी सोप्प आहे. तुम्ही जर कधी प्रयत्न केला नसेल तर जरुर करा. त्याचा पत्ता आहे : http://www.gamabhana.com/gamabhana_ex/.
यात तुम्हाला हवं ते लिहायचं आणि ब्लॉगवर टाकायचं की झालं तुमचं मराठी पोस्ट तयार.
आणि आता दुसर्या 'गमभन' विषयी.
म्हणजेच 'गमभन' दिनदर्शिके विषयी. यामागची संकल्पना काय आहे ते आधी सांगते. हे एक कोर कॅलेंडर आहे. म्हणजे बहुतेक कॅलेंडरवर जिथे चित्र छापतात तिथे यावर चक्क कोरा चौकोन आहे. कल्पना अशी की आपल्या घरतल्या चिमुकल्यानी त्यावर चित्र काढावीत. आपल्या लाड्क्यांची चित्र हा नेहमीच आपल्या कौतूकाचा भाग असतो. ती अभिमानाने आपल्या घरात लावावीत म्हणून हा उपक्रम. मग वर्षाच्या शेवटी आपण त्यातलं आपल्याला सगळ्यात आवडलेल चित्र प्रकाशनाककडे परत पाठवाचं आणि दरवर्षी ते त्या चित्रांचं प्रदर्शन भरवतात. आहे ना मस्त?