हे शहर सोडवत नाही
मी विसरू जाता उरते
मज झाकोळून उगवत राही
हे घडी बिघडले रस्ते
गर्दीने विस्कटलेले
अंथरल्या ऊनचुकांवर
पांघरूण रात्रीची शाई
ही रुतून बसली झाडे
सन्यस्त ढोंगी बैरागी
मोहोर पाहूनी माझे
परतवून पानोपानी
मी नदीविनाही फिरले
देऊळघंटेच्या काठी
आसवआठवांची यमुना
पुलाखालूनी वाही
वर्तूळ बशीशी भिडते
वर्तूळ पुरीचे आणि किती
मोजमापले तरि ओघळती
थेंब जास्तीचे काही
हे शहर सोडवत नाही
मी विसरू जाता उरते
मज झाकोळून उगवत राही