कॉलेजमधे असताना आम्हाला आमचे एक सर नेहमी असं सांगत, हा स्थित्यंतरांचा आणि संक्रमणांचा काळ आहे. आज कॉलेज सोडून बरीच वर्ष झाली तरी हे वाक्य माझ्या आयुष्याला जसं च्या तसं लागू होतं. आश्र्चर्य वाटत कायम 'तटस्थ' असणार्या सरांना आमच्या स्थितीचं हे असं नेमकं वर्णन करणं कसं जमायचं?
कॉलेजमधे रोजचा दिवस घडमोडींचा असायचा. तेव्हा घडणारी, न घडणारी प्रत्येक गोष्टच घटना वाटायची. एखाद्या नुसत्या कल्पनेने मन वेडावून जायचे. न बघता, न स्पर्शताही कित्येक गोष्टी खर्या वाटायच्या. तेव्हाचं सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण होतं.
या सगळ्या पळत्या जगात सर वेगळे ऊठून दिसायचे. अतिशय शान्त चर्या, स्वच्छ पांढुरके कपडे, हातात एक कापडी पिशवी असं सरांच रूप आजही तसं च्या तसं डोळ्यासमोर येतं. सर खूप सावकाश बोलायचे. बोलण्याला एक संथ अशी लय असायची. काव्याचे गुणधर्म सांगताना एकदा ते म्हणाले होते, "स्मरणसुलभता, श्रवणसुभगता हे काव्याचे विशेष असतात". शब्दांच्या अश्या सुंदर रचना ते सहज बोलून जात. उच्चारांचा पडखरपणा वाखाणण्याजोगा होता. "या संदर्भात तुम्ही श्री. के. क्षीरसागर यांचा एक चांगला निबंध आहे तो वाचा", असं ते जाता जाता सांगत. श्री आणि क्षी दोन्ही उच्चार स्पष्ट दीर्घ. विचार उच्चारांहून स्पष्ट असायचे. ज्ञानेश्वरी वर छान बोलायचे. सर कधीच गडबडीने कुठे जायचे- यायचे नाहीत. तरी प्रत्येक हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळी ते हमखास असायचे.
वाङ्मय मंडळाच्या नावाखाली टिवल्या-बावल्या करणारी आम्ही मंडळी तास न तास लाब्ररीबाहेर गप्पा मारत उभे रहायचो. जाता-येता कधी सर भेटले तर दोन शब्द बोलायचे नि म्हणायचे "चालू द्या तुमच"' जणू ते रसरसून जगणार्या आम्हाला सांगायचे तुमचं प्रवाहाबरोबर वाहणं चालू द्या, मी माझ्या शांततेत जातो.
आम्हाला जेव्हा कळलं की अश्या मऊ-मुलायम माणसाच्या प्रबंधाचा विषय होता 'तेंडूलकरांची नाटकं'. तेव्हा खूप खूप आश्चर्य वाटलं होतं. आता कळतं त्यात विसंगत काहीच नव्हतं. तेंडूलकर नावाच्या वादळाचा साकल्याने वेध घ्यायचा असेल तर हवी असणारी धीरोदात्त वॄती, लख्ख समज त्यांच्याजवळ होती.
कॉलेजशी त्यांचं अनेक वर्षांच गूढ आणि गाढ असं नात होतं. शिकण्यापासून शिकवण्यापर्यन्तचा त्यांचा प्रवास त्यांनी या वास्तूच्या उजेडात केला होता. त्यामुळे कॉलेज सोडताना त्यांना वेगळीच अनुभूती येत असावी. त्याकाळात ते निवॄत्ती बद्दल वारंवार बोलत. निवॄत्त होण्यापूर्वीच ते निवॄत्ती झाले होते. हे त्यांचेच शब्द.
दोन वर्षांपूर्वी सर एका कार्यक्रमात भेटले होते. बर्याच वर्षांनंतर सरांना पाहिलं, ओळखायला क्षण दोन क्षण लागले. त्यानी नेहमीप्रमाणे अगदी जिव्हाळ्याने विचारपूस केली. जणू मधली काही वर्ष गेलीच नाहीत. कार्यक्रम होता नेमाड्यांच्या मुलाखतीचा. कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पा चालू असताना नेमाड्यांनी सरांना हाक मारली. आणि कळलं की सर नेमाड्यांचे कॉलेजमधले दोस्त आहेत. विश्वासच बसेना. पण मी त्या दोघानां गप्पा मारताना प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहीलं आहे!
आज इतक्यावर्षांनंतरही, रोजचा दिवस तुफान घेऊन येताना दिसतो. स्थित्यंतरांचा आणि संक्रमणांचा काळ अजूनही संपला नाहीये.
सरांसारखं निवान्त गलबत होऊन जगणं कधी जमेल मला?