Monday, April 27, 2009

कच्च्या करवंदाचं लोणचं


कच्च्या करवंदाचं लोणचं

करवंदाला इंग्रजीत काय म्हणतात मला खरच माहित नाही. त्याच्या सारखं दिसणारं (लागणारं नव्हे) ब्लू बेरीज नावाचं एक फळ मी इंग्लंडला पाहेलं होतं. म्हणून हे पोस्ट मराठीत लिहिते.

कच्ची करवंद आद पाव

तेल २ चमचे

मोहरी १/२ चमचा

गुळ २ चमचे

मीठ चवीनुसार

लाल तिखट १ चमचा

करवंद स्वच्छ धुवून, त्याची डेखं काढून घ्यावीत. एका कढईत तेल गरम करावं, त्यात मोहरी घालून फोडणी करावी. करवंद फोडणीला टाकून एक हलकी वाफ आणावी. मग गूळ, तिखट व मीठ घालावे. गुळ विरघळला की गॅस बंद करावा. लोणचं तयार !

करवंदाचा संदर्भ आला की मला ही कविता हमखास आठवते. माझ्या आवडत्या कवितांपैकी एक असलेली इंदिरा संताची कविता.

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…

No comments: