मी ग्रंथपाल आहे. देणगी म्हणून येणारी पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयाची एक समस्या आहे. हे माझं वाक्य खुप जणांना अतिशयोक्त, अनाठायी किंवा कृतघ्न पणाचं वाटेल. पण खरच सांगते देणगीदार बरेचदा त्यांच्या घरातला कचरा आम्हाला दान देतात. ते पुण्य जमवतात आणि आम्ही (नाईलाजाने) रद्दी. हे दाते बहुदा चांगल्या, विद्वान लोकांचे वंशज असतात. त्यांच्या वाडवडिलांनी जमविलेली पुस्तकं, कागद-पत्र त्यांच्या दृष्टीने निरुपयोगी असतात. पण आमच्या ग्रंथालयाला मात्र ते ती अमूल्य संपत्ती म्हणून दान देतात. आम्हीदेखिल कधी आदराने, कधी अपेक्षेने तर कधी आज्ञेमुळे ही संपत्ती गोळा करतो. मग ती आमच्या ग्रंथालयाच्या सर्वात अंधार्या कोपर्यात पडून रहाते.
सध्या आमच्या ग्रंथालयाचे नुतनीकरण करण्याची लाट आली असल्याने, अनेक वर्ष कोपर्यात समाधानाने (अथवा नाईलाजने) पडून असणार्या या सर्व कागदांना सूर्यप्रकाश दिसला आहे किंवा असं म्हणू या, त्यांनी आम्हाला ज्ञानप्रकाश दाखवला आहे.
त्यातल्या एका, सर्वात मोठ्या, संग्रहाची चाळाचाळ मी गेले काही दिवस करते आहे. एका विद्वान जिऑलॉजिस्ट माणसाचा तो संग्रह आहे. त्यांनी लिहीलेले रीसर्च पेपर्स, निरनिराळ्या ठिकाणी दिलेली भाषणं, त्यांच्या पुस्तकाचं हस्तलिखित असं खूप महत्त्वाचं सगळं त्यात आहे. मी ते नीट रचून, जपून ठेवते आहे. पण या सगळ्या संशोधनविश्वाच्या पलिकडचंही त्यात खूप काय काय सापडतं आहे. जसं की त्यांनी काळजीपूर्वक साठवलेले वेगवेगळ्या देशांचे स्टँप, मुलाची (किंवा नातवाची) तेलीखडूनं रंगवलेली चित्र, मित्रांची पत्र, मशीन बिघडले म्हणून त्या कंपनीला जाब विचारणारे खरमरीत पत्र.... असं खूप काय काय. मी त्या कागदांच्या जगात भांबावून उभी असताना आमच्या शिपायाने माहिती दिली, खूप मोठा बंगला होता. एका खोलीत आम्हाला नेलं आणि सांगितलं सगळं घेऊन जा. काहीही ठेऊ नका. खोलीत चहूकडे पुस्तकं, कागद पसरलेले. आम्ही दोन टेम्पो करून सगळं बॉक्समधे भरून आणलं.
मन विषण्ण झालं. आपल्यानंतर एवढचं उरतं ? किंवा आपल्यानंतर उरलेल्याचं फक्त असच होतं ? आपण का मग काडी काडी जमवतो? कशासाठी कागदावर शब्दांची इमारत उभारतो ? का एखादा कागद हरवला तर दिवस दिवस अस्वस्थ होतो? चांगल्या, वाईट प्रत्येक प्रसंगी पत्र का लिहितो ? आपण जमवलेल्या अवाढव्य शब्दजंजाळाचं काय होईल आपल्यानंतर?
आपल्यानंतर ...... आपल्यानंतर जग असेल ही शक्यताच कधी मनात आली नव्हती. म्हणजे जग तर असणारच आहे पण आपलं सगळं कागदी धन त्या जगात असेल, ते पोरकं होईल असं इतक्या प्रकर्षाने आणि पडखरपणे कधीच जाणवलं नव्हतं. आता प्रत्येक कागद मला मनावरचं ओझं वाटू लागला आहे.
लहानपणी मी पेन्सिलीला टोक केलं की निघणारी कात्रणं जपून ठेवत असे. त्याची फुलपाखरं होतात अशी माझी ठाम समजूत होती. एकेदिवशी घरी आले आणि पाहिलं तर ती सगळी कात्रणं गायब झाली होती. आई किंवा ताईने स्वच्छतेच्या नावाखाली ते केलं असावं, असं वाटून मी गप्प बसले. खूप वाईट वाटूनही त्रागा न करण्याचा समजूतदारपणा तेव्हा माझ्याठायी होता. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आले. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या अवती-भवती बागडत होते. अचानक ते म्हणाले, 'काल दुपारी एक गंमतच झाली. तुझ्या दप्तरातून काही रंगीत फुलपाखरं भिरभिरत बाहेर पडली.' मला ते खरं वाटलं नाही पण सुखावून गेलं.
आपण लिहिलेल्या पत्रांची, जपलेल्या कागदांची, आपल्यानंतर अशीच फुलपाखरं व्हावीत आणि काही क्षणांचं रंगीबेरंगी आयुष्य जगून अदृश्य व्हावीत. मला माझ्या घरातून उडणारी लाखो फुलपाखरं दिसू लागली आहेत......
No comments:
Post a Comment