Friday, October 9, 2009

जागतिक टपाल दिवस

दरवर्षी ९ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. माझं पोस्टाशी खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. अनेक वर्षे न चुकता मी पोस्ट्मनच्या येण्याची वाट पाहिली आहे. पत्र येण्यातलं सुख, पाठवण्यातली हूरहूर पुरेपुर अनुभवली आहे. माझे हॉस्टेल वरचे दिवस, परदेशातलं वास्तव्य या पत्रांनीच सुसह्य केलं आहे.
आजकाल खुप कमी लोक पत्र लिहितात अशी तक्रार वारंवार ऐकायला मिळते. पण माझ्या नशिबाने मला सुंदर पत्र लिहिणारा प्रियकर मिळाला. जाईल तिथून (कधी मद्रास, कधी अहमदाबाद, कधी, जर्मनी) न चुकता पत्र लिहिणारी एक हुशार मैत्रीण, आवर्जून पत्र लिहिणारे प्रेमळ सर यानी वेळोवेळी पाठवलेली पत्र माझ्यासाठी अनमोल आहेत. आणि ही सगळी पत्र माझ्यापर्यंत पोचवणार्‍या टपाल खात्याची मी ऋणी आहे.
माझ्या अडिच वर्षाच्या लेकालाही पत्र पाठवण्यातली गंमत कळली आहे. जागतिक टपाल दिवसासाठी खास त्याने लिहिलेल हे पत्र. आणि सोबत आमच्या गुंडीबाईंच्या पुस्तकातली एक कविता (थोडासा बदल करून)
कितीतरी दिवसात बाबा नाही भेटला
बाबासाठी मनू फुरंगटून बसला
शेवटी घेतले त्याने पत्र लिहायला
शब्दासाठी कोण बसणार अडायला ?
बाबा, तुझी मला आठवण येते फार
उभ्या आडव्या रेषा त्याने मारल्या चार
आईने लिहिला पत्ता, पत्र पोस्टात गेले
रेषांचे वळण नेमके बाबालाही कळले !
बाबा आला धावत, मनूला मारली मिठी
आगळ्या वेगळ्या पत्राचं, त्याला कौतुक किती !

No comments: