आज आषाढ सुरू झाला. आज पहाटे आमच्या गावातही चक्क पाऊस पडला. कालिदासाच्या कृपेने आज हवा मस्त पावसाळी आहे. सगळीकडे ओलीगार झाडं आणि हळवी उन्हं आहेत. जांभूळ रस्ता उधाणला आहे. बकुळीचा गजरा हवेत लह रतोय. वातावरणात मळभ आणि उत्साह आहे. खुप दिवसांनी हलकं हलकं वाटतयं. लिहावसं वाटतयं.
सुट्टीत घरी जाऊन आले. काही जुन्या, काही नव्या मित्र-मैत्रिणींना भेटणं झालं. जुनं सगळं सुटत सुटत चाललंय. उगाच वागवण्यात अर्थ नाही. काही बंध तुटले तर खुशाल तुटू द्यावेत. नवे जुळतील किंवा जुळणार नाहीत. पण मनात बी रुजण्याइतकी ओल शिल्लक ठेवावी. असा धडा मिळाला. तो आता मनापासून गिरवायचा ठरवला आहे.
सध्या मी स्वतःला भरतकामाचा छंद लावून घेण्याचा प्रयत्न करते आहे. पूर्वी मी खुप आवडीने भरतकाम आणि क्रोशाच विणकाम करत असे. पण ती सवय सुटली. आता परत सुरू करताना जड जातयं. पण माझ्या अगदी जवळच्या माणसाने हट्ट केला आहे त्यामुळे हा उपक्रम करावाच लागेल. पहिला प्रयोग म्हणून एका टॉप वर कशिद्याची बुट्टी काढायचा विचार आहे. जर चांगला जमला तर फोटो नक्की टाकेन ब्लॉगवर !
No comments:
Post a Comment