Thursday, July 30, 2009
गृहिणी-मित्र
मला पाककलेवरची पुस्तक आणि नियतकालिकं वाचायला खूप आवडतात. टिव्हीवर लागणारे 'कुकिंग शो' पण मी शक्य होईल तेव्हा तेव्हा आवडीने बघते. वाचलेले किंवा पाहिलेले फारच थोडे पदार्थ घरी करून बघितले जातात. एकच असं पुस्तक आहे ज्यातले पदार्थ मी अगदी डोळे उघडे ठेऊन करून बघते. आणि आज पर्यन्त या पुस्तकातला माझा एकही पदार्थ बिघडला नाहीये. ते पुस्तक म्हणजे सिंधूताई साठे यांचं "स्वयंपाक" . ही माझी पाककलेची गीता आहे अस म्हटलं तरी चालेल.
मी नुकत्याच घेतलेल्या दोन पुस्तकांबद्दल आज लिहिणार आहे. पहिलं आहे "गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया" हे लक्ष्मीबाई धुरंधर लिखित पुस्तक मॅजेस्टिक पकाशनाचं आहे, किमंत रुपये ८० फक्त.
हे पुस्तक फारच वेगळं आहे. मी या पुस्तकाबद्दल मायबोलीवर वाचलं होतं. १९१० साली लक्ष्मीबाईंनी हे पुस्तक लिहिलं. जेव्हा जग आताइतकं जवळ आलेलं नव्हतं. आता काय थाई काय नी मॅक्सिकन काय कोणत्याही पाककृती आपण इंटरनेट्वर सहज मिळवू शकतो. पण या पुस्तकातल्या पाककृतींचं वैविध्य अगदी थक्क करणारं आहे. कित्येक परदेशी पाककृती यामधे आहेत जश्या की ब्रिटिश, फ्रेन्च, चिनी इ. त्याकाळात त्यांनी ह्या सगळ्या कुठुन मिळवल्या असतील. या लक्ष्मीबाई कोण होत्या? त्या जगभर फिरल्या होत्या का ? इतके पश्न हे पुस्तक वाचताना पडतात. पण दूर्दैवाने या कोणत्याच प्रश्नांची उत्तर पुस्तकात मिळत नाहीत. लक्ष्मीबाईं विषयीची काहीही महिती कुठेही सापडत नाही. ज्यांनी हे पुस्तक संपादित केलं त्यानी लक्ष्मीबाई धुरंधरांविषयी थोड लिहीलं असतं तर फार बर झालं असतं. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे संपादिकेने या पाककृतींमधे काही कालानुरूप बदल केले आहेत. मला तरी मुळातल्या पाककृती जश्याच्या तश्या वाचायला जास्त आवडल्या असत्या. असो.
लक्ष्मीबाईंनी अनेक परप्रंतीय पदार्थांना मराठी नावं देऊ केली आहेत उदा. ईडल्यां साठी वाफोळ्या. जेली साठी थलथली. ती सगळीच मला आवडली असं नाही पण वेगळी वाटली वाचताना आणि अजून अस जाणवलं की आताशा आपण अशी मराठी नावं देणं जवळ जवळ बंदच केल आहे. पण मग मराठीत नव्या शब्दांची भर कशी पडणार ना?
या पुस्तकातली एक पाककृती मी इथे लिहीणार आहे. म्हणजे हे पुस्तक काय चीज आहे याची थोडी कल्पना येईल.
"खमीराचा भात" ह्या पदार्थाचं साहित्य वाचून मी चक्रावूनच गेले. ते असं होतं : तांदूळ, हळद, कुंकू, चिंच. कृती वाचल्यावर थोडा उलगडा झाला. कृती: एक मातीची हंडी स्वच्छ धुवून त्याला वरच्या बाजूने हळद, कुंकू लावावे. तांदूळ ३-४ वेळा धुवावे व त्यातले अर्धे पाणी हंडीत ठेवावे. नंतर अर्ध्या लिटर पाण्यात तांदूळ शिजवून पेज हंडीत ओतावी. व भात मंदाग्नीवर वाफवून घ्यावा. तीन दिवस हंडीतील पेज व धुतल्या तांदळाचे पाणी झाकून ठेवावे. ते ३-४ दिवसांनी आंबते. लवकर आंबण्यासाठी थोडी चिंच घालावी. ३-४ दिवसांनी भात करताना हंडीतील पेजपाणी तांदूळात ओतून भात शिजवावा. असा केलेला भात किंचीत आंबट लागतो परंतू तो तीन दिवस बिघडत नाही. किंवा तार येऊन ऊतरत नाही. म्हणून हा भात प्रवासोपयोगीही होतो. लाल मातीच्या हंडीत भात केला तर तो अधिक रुचकर व पौष्टिक होतो.
सगळ्याच कृती अश्या आगळ्या-वेगळ्या नाहीयेत. बर्याच आपण नेहमी करतो त्या पदार्थांच्या आहेत. या शिवाय गूजबेरीजची वाईन (पान क्र. २३६), अंड्याचे चालते बोलते सॉस (मेयोने सॉस) (पान क्र. १९४) अश्या अनेक लक्षवेधक पाककृती यात आहेत.
बघितल्यापसुन मी या पुस्तकाच्या प्रेमात पडले आहे. हे पुस्तक एखाद्या कादंबरी पेक्षा जास्त वाचनीय वाटतयं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
hello, i am trying to get this book, but havent had any luck yet. please kindly could you scan this book and mail me on priyadhakorkar@gmail.com. please. i shall always be thankful to you.
Please scan the book and send me on deepakmore362@gmail.com. Pls. I hope u will send me.
मी सुद्धा हे पुस्तक खूप शोधलं, नाहीच सापडलं. कृपया मला स्कॅन करून पाठवाल का? तसंच लक्ष्मीबाई धुरंधर यांची थोडी माहीती इथं 👇 होती.
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/chaturang/safar-khadyagranthanchi/gruhini-mitra-food-recipe-book-marathi-articles-1456989/lite/
माझा इमेल sudeshnapradhanjisw@gmail.com. कृपया स्कॅन पाठवा.
Post a Comment