Wednesday, February 13, 2008

'अंगत पंगत' विषयी थोडसं . . .

अगोदर 'अंगत पंगत' म्हणजे काय? हे ठाऊक नसणार्‍यांसाठी सांगते. 'अंगत पंगत' म्हणजे. एकत्र बसुन, शक्यतो अंगणात वगैरे, गप्पा मारत जेवणे.

लहान असताना आम्ही वाडयात 'अंगत पंगत' करत असू. मला ते फार आवडत असे. पण 'अंगत पंगत' करायला आई ची परवानगी मिळवणे हे मोठे कौशल्याचे काम असे. पण आम्ही "प्लीज आई, हो म्हण ना! अमुक तमुक ची आई पण हो म्हणाली आहे. मला सकाळची पोळी भाजी पण चालेल." असे सांगून आईला मनवत असू. प्रत्येक घरतल्या आईला असे विनवावे लागे. तेव्हा कुठे आमचा बेत यशस्वी होई. प्रत्येक आईची एक स्वतंत्र समस्या असे. कोणाचा स्वंयपाक तयार नसे. कोणी नुस्ती मूगाच्या डाळीची खिचडी टाकलेली असे, ती तिला चारचौघात द्यायची लाज वाटे. तर कोणाकडे त्याकाळी सार्वजनिक ठिकाणी निषिध्द मानली जाणारी अंडाकरी केलेली असे. एक ना अनेक समस्या. पण आम्ही सगळ्यावर तोडगा काढत असू.
शाळेत असताना मधल्या सुट्टित झाडाखाली बसून आमची 'अंगत पंगत' रंगत असे.
कॉलेज मधे अभ्यासाच्या नावाखाली, अभ्यासिकेत तास न तास बसून आम्ही जी मजा करत होतो, त्याचा 'अंगत पंगत' हा एक अविभाज्य भाग होता. त्याबद्दल सविस्तर पुन्हा केव्हातरी लिहीनच.
तर सांगायचा मुद्दा असा की, हा माझा ब्लॉग म्हणजे अशीच 'अंगत पंगत' असणार आहे. गप्पा आणि खाणं पिणं यांची मैफिल.

No comments: