Wednesday, February 13, 2008

प्रेम कर ...

आज १४ फेब्रुवारी आहे. व्हॅलेंटाईन डे. आज मी माझ्या प्रेमाविषयी लिहीणार आहे. ज्या काही अ-मानवी गोष्टींवर मी मनापासुन प्रेम करते त्यांच्याविषयी.

पहिली फुलं. माझं फुलांवर खूप खूप प्रेम आहे. मला ती सगळीकडे आवडतात; झाडांवर, वेलींवर फुललेली, अंगणात विखुरलेली , फुलदाणीत सजवलेली, गजरा करून केसात माळलेली, ओंजळीत सांभाळलेली, गाभार्‍यात देवाला वाहिलेली सगळी सगळी फुलं मला आवडतात. ती मला किती किती रुपात भेटली म्हणून सांगू? एका आडगल्लीत बोगनवेलीशी गप्पा मारत उभा असलेला टॅबूबिया मी पहिलाय. 'वळिवाचे ढग आले वरती, धरती खाली आसुसली' अश्या प्रसंगी वार्‍यावर पाकळी न पाकळी उधळून देणारा बहावा मी पहिलाय. भिंतीवर उगवलेली हट्टी सदाफुली पाहिलीये. कितीतरी फुलझाडांची मला एखाद्या जिवलग मैत्रिणीसारखी आठवण येते. ज्याचं पहिलं फुल आलं की आम्ही अभ्यासाला सुरूवात करायचो तो नीलमोहर, आमच्या सारखं बडबड ते पावडर पफचं झाडं, पाऊल वाटेवरचा चिमणचारा, त्याच्याकडे नेणारी वाट सजवणारी सोनसावरी ..... अश्या सार्‍या सख्या.

दुसरी माझी मराठी भाषा. एकदा आमच्या जर्मन क्लास मधे नवीन क्रियापद शिकवलं. रेग्नेन म्हणजे पाऊस पडणे. आमच्या शिक्षीकेनी ते मला "चालवून" दाखवायला सांगितलं. मी आपलं चालवलं इश रेग्नं ... वगैरे तर त्या हसल्या म्हणे हे इम्पर्स्नल (म्हणजे अपौरूष का ?) क्रियापद आहे. याचं वर्तमान काळात एकच रूप होत; एस रेग्नेन. सगळे मला हसले. मला वाईट वाटलं. पण नंतर विचार करताना मला त्याभाषेचंच हसू आलं. कारण माझ्या मराठी भाषेत, मी बरसू शकते, तो बरसू शकतो ... किती छान ना ? म्हणून मला आवडते 'माझी मराठी'.

तिसरा उन्हाळा. मला उन्हाळा खूप आवडतो. माझ्यासाठी उन्हाळा म्हणजे, मोगर्‍याची फुलं, लिंबाचं सरबत, बहाव्याचे घोस, आमरस, निवान्त दुपार, निळंशार आभाळ, वळिवाचा पाऊस, वाढदिवस .... आणि बरचं काही. त्याला उकाडा म्हणणं म्हणजे अपमान आहे त्याचा. भर उन्हात एखाद्या डेरेदार झाडाखाली उभं राहून पहा. शीतल म्हणजे काय ते कळतं. एरवी थंडीत हा अनुभव मिळेल? बाहेर भरगच्च ऊन असताना लायब्ररीत दिवसभर बसून बाहेर पडल्यावर दिसणारी संध्याकाळ काय रम्य असते!
मी तर सध्या फक्त वाट पहाते आहे, पहिला फुललेला गुलमोहर दिसण्याची.

1 comment:

Mahesh said...

Really Nice Blog!! Keep it up!!!

http://mimarathicha.blogspot.com